ठाणे, दि. 04 ऑगस्ट :- येत्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये आतापर्यंत कोकण विभागातील 88 हजार 194 शेतकऱ्यांनी योजनेत भाग घेतला आहे. योजनेतील सहभागाकरिता बिगरकर्जदार शेतकऱ्यांना दि.14 ऑगस्ट, 2025 पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना दि.30 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये आलेली घट गृहीत धरून विमा संरक्षण लाभणार आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागेल. कोकण विभागातल्या भात, नाचणी व उडिद पिकांकरीता विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर खालीलप्रमाणे आहे.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा :- भात पीकाकरिता – विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 61 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु./हेक्टर) – 457.50.
ठाणे, पालघर व रत्नागिरी जिल्हा :- नाचणी पीकाकरिता – विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 35 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु./हेक्टर) – 87.50.
रायगड व सिंधुदुर्ग जिल्हा :- नाचणी पीकाकरिता – विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 40 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु./हेक्टर) – 100.
पालघर जिल्हा :- उडीद पीकाकरिता – विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 25 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु./हेक्टर) – 62.50.
योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवणे गरजेचे आहे. पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
पीक विम्यासाटी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरून व विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून वैयक्तिकरित्याही योजनेत सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सुलभता यावी व बँकामधील गर्दी टाळावी याकरिता शेतकऱ्यांचे अर्ज कॉमन सर्विस सेंटर (CSC) मार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरिता योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. अधिक माहितीकरीता जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे बालाजी ताटे यांनी केले आहे.
