मुंबई, दि.16 सप्टेंबर 2025 : कोकणाच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि दुःखाचा जिवंत ठेवा जपणारा पहिलाच संपूर्ण कोकणी व प्रेमळ मालवणी भाषेतला चित्रपट – “कुर्ला टू वेंगुर्ला” – प्रेक्षकांसाठी 19 सप्टेंबर 2025 रोजी एकाच वेळी 150 थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाचा खास शो 12 सप्टेंबर रोजी प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे मिनी थिएटर येथे मान्यवरांसाठी आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून कोकणातील ग्रामीण भागातील समस्या, स्थलांतर, शिक्षणाचा अभाव, रिकामी होणारी शाळा व उद्ध्वस्त होणारी निसर्गसंपन्न भूमी या गंभीर प्रश्नांना सामोरे जाणारा सामाजिक दस्तऐवज ठरतो.
लेखक व निर्माता अमरजीत आमले यांची संकल्पना आणि दिग्दर्शक विजय धोंडू कळमकर यांचे कसदार दिग्दर्शन यातून साकारलेला हा चित्रपट लोकवर्गणीतून उभा राहिलेला आहे. आर्थिक पाठबळ नसतानाही कोकणातील कलावंतांनी आपल्या जिव्हाळ्याने या चित्रपटाला साकार करून दाखवले आहे.

चित्रपटाचे वैशिष्ट्य
वेंगुर्ला गाव, समुद्रकिनारे, व कोकण निसर्गाची अद्वितीय शोभा यांचे दोन तासांचे पर्यटनदर्शन.
कोकणातील सामाजिक वास्तव व महाराष्ट्रातील ग्रामीण वेदना यांचा प्रखर वेध.
हसवणारा, भावूक करणारा व मनाला चटका लावणारा हृदयस्पर्शी प्रवास.
मुलींना मुंबईत स्थायिक जोडीदार हवा, मुलांची वाढती लग्नाची वये – या आभासी अपेक्षा आणि बदलती सामाजिक वास्तवता यांचाही मार्मिक उल्लेख.
कुटुंबसंस्थेचे मूल्य, पती-पत्नीचे नातं, त्याग, तसेच तरुणांच्या स्वप्नातून घडणारा गावाचा कायापालट यांचा प्रबोधनपर संदेश.
चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे –
“तुझं आहे रे तुज पाशी! परी तू का रे भटकशी!!”
ही ओळ केवळ नायकाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जागृती आहे.
कोकणवासी, मुंबईकर, पुणेकर यांनी हा चित्रपट अवश्य पाहावा, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे. सामाजिक संस्था, महाविद्यालये, शाळांनी सामूहिकरीत्या चित्रपट दाखवून विद्यार्थ्यांना आणि तरुणांना कोकणाच्या वास्तवाशी जोडले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा चित्रपट आवर्जून पहावा. खेड्यातील वास्तव परिस्थितीची जाणीव करून द्यावी. यासारखे दर्जेदार चित्रपट वारंवार निर्मित व्हायला हवेत.
चित्रपट निर्मितीमध्ये सध्य परिस्थिती बदलण्यासाठी तळमळीने प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यासोबतच काया पालट करण्यासाठी उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी ग्लोबल कोकणचे ध्यास घेतलेले संजय यादवराव, मी उद्योजक होणारचचे अध्यक्ष निलेश मोरे, तसेच धंद्यासाठी बिनव्याजी भांडवल उपलब्धतेसाठी मार्गदर्शन करणारे व तयार मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणारे KCCI चे अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे (मो. 9619897328), इतर राजकीय व सामाजिक संस्थां यांचेही सक्रिय प्रयत्न आहेत. म्हणूनच तरुणांच्या सहभागाने निसर्गरम्य कोकण समृद्ध कोकण बनण्यास वेळ लागणार नाही.
—
✍️ अशोक विशे
ठाणे जिल्हा प्रमुख
कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज
