ठाणे,दि.04 फेब्रुवारी 2026 : दि.19 डिसेंबर 2025 रोजी, भाईंदर येथील मानवी वस्तीमधून रेस्क्यू करण्यात आलेल्या नर बिबट्यास वैद्यकीय तपासणीकरिता उप संचालक (दक्षिण) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या अधिनस्त क्षेत्रात उपलब्ध सुविधा तसेच पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या निगराणीत ठेवण्यात आले होते, पकडलेल्या बिबट्याचे मुक्तेबाबत गठीत समितीची दि.22 डिसेंबर 2025 रोजी बैठक होऊन त्यामध्ये चर्चेअंती समितीने सर्व बाबींचा विचार केल्यानंतर बिबट्याला Satellite Collar लावून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम प्रदेश मुंबई व वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला.
त्यानुषंगाने रेस्क्यू केलेल्या बिबट्यास Satellite Collar बसविण्यात आली असून, या बिबट्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर व त्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर दि.25 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9.25 च्या सुमारास सदर बिबट्याला येऊर वनपरिक्षेत्रातील परिमंडळ नागला, नियतक्षेत्र ससुनवघर सर्वे क्रमांक-58 मधील वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये मुफ्त करण्यात आले होते. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करतेवेळी सुदृढ, चपळ असल्याचे दिसून आले तसेच त्यास बसविलेले Satellite Collar चालू स्थितीत असून, वन्यजीव बचाव पथक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येऊर वनपरिक्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी व WCS एनजीओ प्रतिनिधी यांच्यामार्फत पुढील संनियंत्रण करण्यात येत होते.
दि.25 डिसेंबर 2025 पासून ते दि.30 डिसेंबर 2025 पर्यंत या बिबट्याचा ससुनवघर नियतक्षेत्रामध्ये त्याचा वावर दिसून आला होता. Satellite collar Signal location नुसार त्याचे प्राप्त स्थळ वनक्षेत्रातीलच होते. येऊर वनपरिक्षेत्रातील परिमंडळ नागला, नियतक्षेत्र ससुनवघर सर्वे क्रमांक 58 मधील वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्यात आलेल्या बिबट्याने दि.31 डिसेंबर 2025 रोजी, ससुनवघर वनखंड क्रमांक- 1115 या क्षेत्रातील गुफा असलेल्या क्षेत्रामध्ये कुत्र्याची शिकार केल्याचे आढळून आले होते, त्यानंतर या बिबट्यास मुक्त केलेल्या ठिकाणी हा बिबट्या फिरती करीत असल्याचे निदर्शनास आले असून, दि.05 जानेवारी 2026 रोजी नागला ट्रेल वरती जागोजागी पायाने उकरल्याले तसेच त्याची विष्टा आढळून आली होती. Satellite collar Signal द्वारे ही माहिती मिळाली असून, हा बिबट्या शारिरीकदृष्ट्या सुदृढ असल्याचे कॅमेरा ट्रपमध्ये दिसून आला होता.
परंतू दि.02 फेब्रुवारी 2026 रोजी, संध्याकाळी या बिबट्याला लावलेला Satellite collar चा Mortality Signal आल्याने, येऊर वनपरिक्षेत्रातील, परिमंडळ नागला, नियतक्षेत्र नागला राखीव वन सर्वे क्रमांक-73, वनखंड क्रमांक- 1118 मध्ये तात्काळ या विभागातील अधिकारी / कर्मचारी तसेच श्री. निकेत सुर्वे, डब्ल्युसीएस इंडिया व टीम यांनी घटनास्थळ जाऊन पाहणी केली असता, हा बिबट्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले आहे. या बिबट्याचे शव असलेल्या परिसराचा पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा नोंदविला. या बिबट्याची नखे, दात व इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून आले आहे. नैसर्गिक उजेड कमी झाल्याने या बिबट्याचे शव विच्छेदन करणे शक्य झाले नाही. दि.03 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी डॉ.निखिल बांगर, पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली व डॉ.प्रशांत गाढवे, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्याद्वारे नियमानुसार शवविच्छेन (Post-mortem) प्रक्रिया केली असून, नमुने वैद्यकीय व तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचा कारणाबाबत निष्कर्ष काढता येईल. याबाबत परिमंडळ नागला वनगुन्हा क्रमांक-डब्ल्युएल-01/ दि.02 फेब्रुवारी 2026 अन्वये वनगुन्हयांची नोंद करण्यात आली असून, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम-1972 अन्वये पुढील आवश्यक कार्यवाही डॉ.जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम प्रदेश, मुंबई, सौ.अनिता पाटील, वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली व श्री. प्रदीप पाटील, उप संचालक (उत्तर) येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांनी दिली आहे.
