ठाणे, दि. 06 : कलर मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा महाराष्ट्रातील प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम असून त्याद्वारे अनेक बहुजन कलाकारांना मोठी ओळख मिळाली आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या 25 व्या भागात कलाकारांची ‘नजर उतरविण्या’चा अंधश्रद्धायुक्त प्रसंग दाखवण्यात आला. या दृश्यामध्ये काही शब्द पुटपुटत मिरची कलाकाराच्या शरीरावरून ओवाळून गॅसवरील तव्यावर टाकण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.कलर मराठी वाहिनीवरून अंधश्रद्धा पसरवणारे प्रसारण करण्यात आल्याबद्दल संबंधित वाहिनीने जाहीर दिलगिरी व्यक्त करावी तसेच यापुढे समाजात चुकीचा संदेश जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी केली आहे.या संदर्भात अंनिसने वाहिनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे.अशी माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचा सध्या सहावा सिझन सुरू आहे. मात्र, या कार्यक्रमातून अंधश्रद्धा पसरवणारे दृश्य प्रसारित झाल्याने अंनिसने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.अंनिसच्या मते ही बाब अतिशय गंभीर असून ती सरळसरळ अंधश्रद्धा आहे. अशा दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा रुजण्याचा धोका संभवतो. ही बाब वाहिनीच्या जबाबदार यंत्रणेसह कार्यक्रमाचे दिग्दर्शक व पुरोगामी विचारांचे निवेदक रितेश देशमुख यांच्या लक्षात न येणे किंवा तिचे गांभीर्य न समजणे ही चिंताजनक बाब असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चूक तात्काळ दुरुस्त करून येणाऱ्या भागांमध्ये याबाबत स्पष्ट निवेदन प्रसिद्ध करावे, जेणेकरून प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा बळावण्याचा धोका टळेल. यापुढे अंधश्रद्धा -युक्त प्रसंग प्रसारित न करता, उलट अंधश्रद्धांविरोधात प्रबोधन करणारे कार्यक्रम सादर करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
