ठाणे, दि. 15 एप्रिल 2026 : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण, मुंबई विभाग) आणि सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये ‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’ निमित्त विशेष विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त विभागीय आयुक्त सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याण मंडळाच्या सह उपाध्यक्ष डॉ.सान्वी जेठवाणी, सदस्य डॉ. सलमा उमरखान साखरकर, विभागीय तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळ मुंबई सह अध्यक्ष सोनाली चौकेकर, सदस्य निलोफर मास्के, नूतन राठोड, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त तथा विभागीय तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळ मुंबई चे सदस्य सचिव बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे रविकिरण पाटील, पांडुरंग वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विभागात आणि जिल्ह्यात तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारणासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून तक्रार निवारण: तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करणे, कायदेशीर मार्गदर्शन: त्यांना त्यांच्या अधिकारांसंदर्भात कायदेशीर माहिती देणे, ओळखपत्र वाटप: तृतीयपंथीयांना त्यांची अधिकृत ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी प्रक्रिया राबविणे, सर्वांगीण विकास: त्यांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविणे, या गोष्टींवर भर देण्यात आला. या चर्चासत्रांमध्ये तृतीयपंथी सक्षमीकरणासाठी बजेट, नियोजन आणि अंमलबजावणीचा आढावा, तृतीयपंथी कल्याणासाठी नव्या उपक्रमांचा आढावा: योजना, अंमलबजावणी व परिणाम या विषयांवर अॅड. दिपक सोनावणे, अध्यक्ष, भाकर फाऊंडेशन, निलोफर मस्के, हमसफर ट्रस्ट, साध्य पवार, तृतीयपंथी कार्यकर्ता, विकी शिंदे, तृतीयपंथी कार्यकर्ता, प्रा. प्रभा तिरमरे, निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क, अॅड. अमरीता आशिष प्रयास, एक कोशिश संस्था संस्थापक, सलमा खान, किन्नर माँ संस्था संस्थापक, डॉ. प्रो. वत्सला शुक्ल, एस.एन.डी.टी महाविद्यालय RCWS, सौरभ बोंद्रे, तृतीयपंथी कार्यकर्ता, श्रीम. सोनाली चौकेकर, (सह अध्यक्ष, विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळ मुंबई) या मान्यवरांनी चर्चा केली. या एकदिवसीय कार्यशाळेत केवळ मार्गदर्शनच नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. शब्बो शेख (गणेश वंदना), मेघना बेनू (गवळण), विवेक पाटील (खेळ मांडला), फिदा खान, भाविका पुजारी (सिक्स पॅक बँड), साक्षी मुंबईकर (लावणी) यांनी सांस्कृतिक सादरीकरण केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त विभागीय आयुक्त सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, शासन तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटीबध्द आहे. शासनाच्या योजनांचा विशेषत: शैक्षणिक, आरोग्य, बीजभांडवल या योजनांचा लाभ प्रत्येक तृतीयपंथीयांना मिळावा यासाठी प्रत्येक शासकीय अधिकारी – कर्मचारी, शासकीय यंत्रणा प्रमाणिक प्रयत्न करेल. प्रत्येक तृतीयपंथीयाने पुढे येवून नि:संकोचपणे आपली नोंदणी शासन दरबारी करावी. शासनाकडून आपणास सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल.
यावेळी तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याण मंडळाच्या सह उपाध्यक्ष डॉ.सान्वी जेठवाणी, सदस्य डॉ. सलमा उमरखान साखरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचे, सर्वोच्च न्यायालयाचे आणि केंद्र व राज्य शासनाचे तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांसाठी आभार मानले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने तृतीयपंथीयांच्या उत्थानासाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देवून विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानार्थींची नावे पुढीलप्रमाणे- 1) ज्येष्ठ तृतीयपंथी समाजकार्यकर्ता पुरस्कार – डॉ. सलमा उमर खान साखरकर, 2)तृतीयपंथीय समावेशक कॉर्पोरेट उपक्रम पुरस्कार – उर्वी आराध्या, 3) लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन अनाथ मुलांसाठी सामाजिक कार्य करणारी पुरस्कार (आजिचे घर विशेष) श्रीगौरी सावंत, 4) तृतीयपंथी समुदायासाठी एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्य पुरस्कार – निता केनी, 5) तृतीयपंथी मॉडेलिंग व कलागुण पुरस्कार – खुशी शेख, 6) तृतीयपंथीय उद्योजकता (व्यवसाय) पुरस्कार – झोया शेख, 7) तृतीयपंथीय गायन कौशल्य पुरस्कार – फिदा खान, 8) पहिली तृतीयपंथीय शिक्षक गौरव पुरस्कार – रिया आवळेकर, 9) स्वच्छ भारत अभियानातील तृतीयपंथीय स्वच्छता प्रेरक पुरस्कार – सोनाली चौकेकर, 10) एलजीबीटीक्यूआय समुदायासाठी मानवाधिकार कार्यकर्ता पुरस्कार – विवेकराज आनंद, 11) ट्रान्समॅन गौरव पुरस्कार – ललित साळवे, 12)तृतीयपंथीय हक्कांसाठी लढणारी महिला समाजकार्यकर्ता पुरस्कार – वर्षा विद्या विलास.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त तथा विभागीय तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळ मुंबई चे सदस्य सचिव बाळासाहेब सोळंकी यांनी केले. सूत्रसंचलन राखी तांबट यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी मानले.
