ठाणे, दि.17 एप्रिल 2026 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सामाजिक समता सप्ताहाचा’ समारोप आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे कार्यालयाच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन भिवंडी येथील शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहात दि.14एप्रिल 2026 रोजी करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 8 एप्रिलपासून सुरू असलेल्या समता सप्ताहाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अण्णासाहेब जाधव कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस उपस्थित होते, तर ज्योती घनगाव आणि अमोल कांबळे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद आणि ठाणे जिल्ह्यातील विविध वसतिगृहांमध्ये प्रवेशित असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या व्याख्यानामध्ये ज्योती घनगाव आणि अमोल कांबळे यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून या ऐतिहासिक लढ्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मानवी हक्कांचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी दिलेल्या लढ्याचा वारसा आजच्या पिढीने कसा जोपासला पाहिजे, यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात समाधान इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून व ‘भिमवंदना’ देऊन करण्यात आली, तसेच यावेळी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित ‘भिमगीतांचे’ बहारदार सादरीकरण करण्यात आल्याने संपूर्ण वातावरण भीममय झाले होते.
