ठाणे दि. 20 :- मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 149 मध्ये एकूण 3 लाख 69 हजार 176 इतके मतदार आहेत. त्यापैकी छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या 10 हजार 692 आहे. भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे वेळोवेळी दिलेल्या व प्राप्त निर्देशांप्रमाणे मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मार्फत मतदारयादी शुध्दीकरण व अद्ययावतीकरणाची प्रक्रीया करण्यात येते.
त्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या बैठका, छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या यादीची विविधस्तरावर प्रसिद्धी तसेच मतदानकेंद्र स्तरीय अधिकारी व अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या निवासी पत्त्यावर जावुन छायाचित्र गोळा करण्याची मोहिम देखील मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात राबविली गेली. त्यामध्ये छायाचित्र नसलेल्या 10 हजार 692 मतदारांपैकी फक्त 55 मतदारांचे छायाचित्र प्राप्त झाले. ऊर्वरीत 10 हजार 627 छायाचित्र प्राप्त न झालेल्या मतदारांचे पंचनामे मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात आले.
भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे लोकप्रतिनीधीत्व अधिनियम 1950 व मतदार नोंदणी अधिनियम 1960 मधील तरतुदी नुसार या मतदारसंघातील छायाचित्र नसलेल्या 10 हजार 637 मतदारांची छायाचित्रे प्राप्त न झाल्याने त्यांची नावे त्यांना पुरेशी संधी दिल्यानंतर वगळण्यात आली.
मा. भारत निवडणूक आयोग यांचे दि. 03 ऑगस्ट 2021 व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे दि. 04 ऑगस्ट 2021 यांच्या पत्रान्वये दि. 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक 01 नोव्हेबर ते 30 नोव्हेंबर 2021 या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ज्यांना आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करावयाचे आहे त्यांनी नमुना क्रमांक 06 छायाचित्रासह व उचित कागदपत्रांसह मतदार नोंदणी अधिकारी, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, सहायक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती व कळवा प्रभाग समिती यांचे कार्यालया याठिकाणी सादर करावे. याशिवाय अॅण्ड्रॉईड मोबाईल वर VOTER i APP (VHA) डाऊनलोड करुन किंवा NATIONAL VOTER SERVICE PORTAL (NVSP) वर जावुन देखील ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करता येते असे मतदार नोंदणी अधिकारी 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ यांनी कळविले आहे.



