ठाणे दि.२३ : जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून जिल्हाच्या ग्रामीण भागात केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची अंमलबजावणी उत्तम होत असली तरी जी घरकुले अपूर्ण आहेत ती पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्टपुर्ती करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसासाहेब दांगडे यांनी गुरुवारी सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. घरकुलांची शंभर टक्के उद्दिष्टपुर्ती हेच लक्ष असल्याचे सांगतानाच प्रपत्र ड बाबतची प्राधान्यक्रम यादी सर्व ग्रामपंचायतीनी ५ जानेवारीपर्यंत अंतिम करून जिल्हास्तरावर सादर करणे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियान ( टप्पा २ ) मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीस ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांच्यासह सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी पंचायत , ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामीण गृह निर्माण अभियंता उपस्थित होते.
या बैठकीत डॉ. दांगडे यांनी अपूर्ण घरकुलांचा ग्रामपंचायत निहाय सखोल आढावा घेतला. लाभार्थ्यांचे घरकुल अपूर्ण का राहिले आहे याचीही कारणामीमांसा जाणून घेतली. तसेच लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात डेमो हाऊसची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना डेमो हाऊस दाखवून त्या पद्धतीने लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास प्रोत्साहित करावे असेही त्यांनी सांगितले.
सध्या जिल्हात प्रधानमंत्री आवास योजनेची ४७८ घरकुले अपूर्ण आहेत तर राज्य पुरस्कृत योजनेची २८३ घरकुले अपूर्ण आहेत. असे एकूण ७६१ घरकुले अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करून लाभार्थ्यांच्या पक्क्या घराचे साकार करण्यासाठी प्रयत्न करा असे डॉ. दांगडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सांगितले.
९ हजार ४८९ घरकुल पूर्ण
ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून सन २०१६ -१७ ते सन २०२० -२१ या पाच वर्षात शहापुर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांसाठी आलेल्या उद्दिष्टापैकी ९ हजार ४८९ हजार घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ही कामगिरी राज्यात तिसऱ्या क्रमांकांची तर कोकण विभागात पहिल्या क्रमांकाची ठरली आहे.
