ठाणे (प्रतिनिधी)- मुंब्रा येथील तथाकथीत सामाजिक कार्यकर्ता बाबा घडीयाली याने डॉक्टर्संना लक्ष्य करुन त्यांना बोगस ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. आता हाच बाबा घडीयाली जेरबंद झाला असून त्याच्या लॅपटॉप, फोन जप्त करुन सखोल चौकशी करावी आणि त्यास कठोर शासन करावे, अशी मागणी मुंब्रा येथील डॉक्टर्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष मोईनुद्दीन राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
काही महिन्यांपूर्वी बाबा घडीयाली यांनी मुंब्रा- कौसा येथील अनेक डॉक्टर्सवर बोगस असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्याविरोधात तक्रारी करण्याचे सत्र सुरु केले होते. मात्र, या सर्व डॉक्टर्सनी घडीयाली याच्याविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. अखेरीस डॉ. डिंगा यांच्याशी गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांस अटक करण्यात आलेली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राऊत बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉक्टर्स सोशल फाऊंडेशनचे सर्व डॉक्टर उपस्थित होते.
डॉ. राऊत यांनी सांगितले की, अब्दुल घडीयाली याने आम्ही बोगस डॉक्टर असल्याचे सांगून आमची बदनामी केली. त्यांच्याविरोधात 13 एनसी दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्याची दखल घेऊन 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक गुन्हा आपल्या फिर्यादीवरुन दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही अब्रुनुकसानीचाही खटला दाखल केला आहे. डॉ. शाहिन डिंगा यांच्याबाबत गैरव्यवहार केला असल्याने घडीयाली अटक केली आहे. घडीयाली याला अटक करण्यात आली असली तरीही अद्याप 9 एनसीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आमची अशी विनंती आहे की या सर्व एनसींचे रुपांतर एफआयआरमध्ये करण्यात यावे. आम्हाला अशी अपेक्षा होती की पोलीस कस्टडीसाठी पोलीस निरीक्षक शेवाळे हे प्रयत्न करतील; पण, त्यांनी तसे प्रयत्न न केल्यामुळे घडीयाली हे न्यायालयीन कस्टडीमध्ये गेले आहेत. परिणामी, अनेक गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली नाही. आता पोलिसांनी सखोल तपास करुन घडीयाली यास कठोर शासन करावे, अशी मागणीही यावेळी सर्व डॉक्टरांनी केली.
Related Stories
January 21, 2022
