
ठाणे दि. २७ (जि.प): प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हातील २७ ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेत जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. या दोन्ही अभियानाची आवश्कता, गावाला होणारे फायदे त्याचबरोबर कोणत्या प्रकारची कामे केली जाणार आहेत यांची विस्तृत माहिती ग्रामसेवकांनी नागरिकांना दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन होणाऱ्या ग्रामसभेत या दोन्ही अभियानाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ग्रामसेवकांनी जल जीवन मिशन बाबत मार्गदर्शन केले. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवीन शौचालय बांधणे, नादुरुस्त शौचालय दुरुस्त करणे, एक खड्डा शौचालय रूपांतर करणे, शोषखड्डा मोहिम राबविणे, हागणदारीमुक्त अधिक गाव घोषित करणे, आदी कामे या अभियानातून पूर्ण करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली.
जिल्हातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी. शहापूर या पाचही तालुक्यातील ४३० ग्रामपंचायतीमधील ७९२ गावांपैकी ३६२ गावात सांडपाणी व घनकचऱ्याची कामे सुरु आहेत. तर जल जीवन मिशन अभियानातून १३८४३६ कुटूंबांना वैयक्तीक नळ जोडणीने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनपूर्वक कामांची आखणी करून याबाबतचा आढावा नियमित घेण्यात येतो असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी सांगितले.
——–०००००० ————-
जनसंपर्क कक्ष, जिल्हा परिषद, ठाणे
