ठाणे दि. २८ : -ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळातर्फे जागतिक समाज कार्य दिनानिमित्ताने समाज कार्य विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने राज्यस्तरीय परिषदेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत १५० पेक्षा जास्त विद्यार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, कंपन्यांचे अधिकारी, नामवंत सामाजिक कार्यकर्ते, संशोधक तसेच शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
या परिषदेचे उद्धाटन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. भारताच्या लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या ‘समाज कार्य प्रशिक्षण आणि कार्यपद्धती’ संबंधित मसुद्याची माहिती त्यांनी दिली. परिषदेचे बीज भाषण प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ डॉ. नीलेश हेडा यांनी केले. त्यामध्ये त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता विविध प्रकारचे विकास प्रकल्प राबविण्यात स्थानिक नागरिकांशी सल्ला मसलत करण्याचे महत्व विशद केले. त्यानंतर ‘समाज कार्य विषयाचा अभ्यासक्रम व सामाजिक वास्तव’ या विषयावर प्रा. डॉ. फरीदा लांबे, समाजशास्त्रज्ञ डॉ. अजित कानिटकर, दिशा संस्थेच्या संस्थापक ॲड. ज्योती खांडपासोले आणि फोर्ब्स अँड मार्शल च्या अधिकारी श्रीमती बीना जोशी यांनी मार्गदर्शन केले. या दोन्ही चर्चासत्राचे संयोजन डॉ. वीणा जोशी आणि सुवेध जयवंत यांनी केले. त्याचबरोबर अभिव्यक्ती संस्थेचे संस्थापक नितीन परांजपे आणि निर्माण संस्थेचे कार्यकर्ते अमृत बंग यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
शिक्षण आणि आरोग्य तसेच महिला व मुलांच्या विविध समस्यांवर विद्यार्थांचे प्रभावी सादरीकरण
राज्यातील ३५ विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि आरोग्य तसेच महिला व मुलांच्या विविध समस्यांवर प्रभावीपणे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांचे परिक्षण मुंबईतील डॉ. एल्विस थॉमस आणि कोल्हापूरमधील डॉ. दीपक भोसले, नागपूरमधील डॉ. केशव वाळके आणि पुण्यातील डॉ. शर्मिला रामटेके यांनी केले. या परिषदेत शोधनिबंध आणि पोस्टर्स सादर करण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना लातूर विभागाचे समाज कल्याण उपायुक्त अविनाश देवसत्ववार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. दरम्यान परिषदेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे ट्रस्टी सुबोध जठार यांनी स्वागत केले. तर रामचंद्र देशपांडे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
