ठाणे दि. २८ : ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जल्लोषात पार पडलेल्या 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात ठाण्यातील श्री स्थानक संस्थेच्या तहान या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ठाणे केंद्रातर्गत झालेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल सांस्कृतिक संचालनालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे शनिवारी जाहीर करण्यात आला आहे.
ठाणे केंद्राची हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या काळात पारपडली असून यात जिल्ह्यातील 16 नाटकांचे सादरीकरण झाले होते. यापैकी प्रथम पारितोषिक मिळालेल्या श्री स्थानक संस्थेच्या तहान या नाटकाला आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या श्री जरी मरी ट्रस्ट या वसई येथील संस्थेच्या “नात्याची गोष्ट” या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तर हौशी नाट्य स्पर्धेत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या संस्थेच्या “तुंबई” या नाटकाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे.
60 व्या राज्यस्तरीय हौशी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातील प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक “तहान” या नाटकाचे दिग्दर्शक विजय पाटील याना मिळाले आहे. नेपथ्य प्रकारात प्रथम पारितोषिक “तहान” नाटकातील विशाल भालेकर याने पटकावले. उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक अनुष्का बोऱ्हाडे हिला” तहान” आणि निलेश गोपनारायण याला “नात्याची गोष्ट” या नाटकासाठी मिळाले आहे.
