————————————————–
ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्गत;
जिल्हातील एक लाख 50 हजार बालके, गरोदर व स्तनदा मातांचे आधार कार्ड काढणार
ठाणे दि. 5 : अंगणवाड्या केंद्रामार्फत शून्य ते सहा वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा मातांना मिळणाऱ्या पोषण आहारात आता सुसूत्रता येणार आहे. कारण पोषण आहार प्रत्येक्ष लाभार्थ्यांना मिळाला की नाही याची नोंद यासाठी ‘पोषण ट्रॅकर ॲप्लीकेशन’द्वारे शासनस्तरावर नियमित घेण्यात येणार आहे. त्यामुळे या ॲप्लीकेशनवर नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य असल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हातील एक लाख 50 हजार बालके, गरोदर व स्तनदा मातांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. अशी माहिती महिला व बाल विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली.
जिल्हात नऊ एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत 1894 अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके,गरोदर व स्तनदा माता असे मिळून जवळपास एक लाख 50 हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी 27 आधारकार्ड संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर इंडियन पोस्ट विभागाने गावातील प्रत्येक पोस्टमनला आधार नोंदणीकरीता व्ही.एल.ईम्हणून कामकाज दिलेले आहे. त्यामुळे पोस्टमनकडे उपलब्ध असलेल्या आधार नोंदणी मशीनव्दारे पोस्टमन आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण करणार आहे. इंडियन पोस्टयांच्या कार्यालयामार्फत यासाठी एकूण 187 आधारकार्ड संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जवळपास 213 आधार संचाव्दारे आधार नोंदणीचे कामकाज जिल्हात सुरू आहे. ही आधार नोंदणी अंगणवाडी केंद्रावर सुरु असून 15 जुलैपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची आधार नोंदणी करण्याचे नियोजन महिला व बाल विकास विभागाने केले आहे.
