ठाणे, दि. 11 : ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने सफाई कामकाजासाठी सफाई कामगारांचे पद बेरोजगार सेवा सहकारी सोसायटी संस्थेमार्फत भरण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीकृत सोसायट्यांनी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात १८ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन (कोकण विभाग) यांचे कार्यालय, शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, भिवंडी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिवंडी येथे सन २०२२-२३ या कालावधीसाठी दैनंदिन सफाईच्या कामकाजाकरीता सफाई कामगाराचे पद बेरोजगार उमेदवाराची बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत भरण्यात येणार आहे. हे पद १ वर्ष कालावधी करीता कंत्राटी पध्दतीने नेमणुक करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या पात्र व इच्छुक सेवा सोसायट्यांनी दि. 18 जुलै 2022 पर्यंत अर्ज करावेत. अपूर्ण किंवा अटीची पूर्तता न करणाऱ्या सेवा सोसायट्यांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. सदर काम देणाऱ्या आस्थापनांची व त्यांच्या कामाची माहिती त्यांच्या सेवा व शर्तीसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे, असे सहायक आयुक्तांनी कळविले आहे.
