कल्याण , दि. 20 जुलै : शिवसेनेतील बंडखोरीने खळबळ उडवून दिली असतांनाच कल्याणच्या शिवसैनिकांनी मात्र या बंडखोरांना चोख उत्तर आपल्या कृतीतून दिले आहे.
दरवर्षी १७ जुलै रोजी शिवसेना कल्याण शाखेचा वर्धापनदिन असतो. वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या शिवाजी चौकातील मुख्य कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजा असते. यावर्षी या सत्यनारायण पूजेसाठी शिवसैनिकांनी केलेल्या गर्दीचा वविक्रम मोडला. गेल्या २५ वर्षांत अशी गर्दी झाली नाही. पुजेसाठी शहराच्या सर्वच भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने आल्याने शिवाजी चौकाला जत्रेचे स्वरुप आले होते.
वारुळातून जशा मुंग्या बाहेर पडतात, त्याप्रमाणे शिवसैनिक प्रचंड संख्येने वर्धापन सोहळ्यासाठी उपस्थित होते. अगदी कल्याण शाखा स्थापन झाल्यापासूनचे शिवसैनिक ते अलिकडे युवा सेनेच्या माध्यमातून जोडले गेलेले नवनवे शिवसैनिक उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर गद्दांराचा धिक्कार होता. पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागू आणि स्वार्थासाठी बाहेर पडलेल्या मंडळींना कायमचे घरी बसवू अशी भावना अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखविली.
कल्याण शिवसेनेच्या या वर्धापन सोहळ्यास ८६ वर्षांचे काका हरदास, कल्याणचे पहिले शाखाप्रमुख माधव कर्वे, बाळ हरदास, भाई दिक्षित, तुषार राजे, प्रा. उदय सामंत, माजी महापौर रमेश जाधव, चंद्रशेखर देशपांडे यांच्यासह अनेक जुनेजुने शिवसैनिक तसेच नव्या दमाचे सैनिकही या वर्धापन सोहळ्यासाठी खास उपस्थित होते.
वर्धापन सोहळ्यास नव्याने नियुक्त झालेले शहरप्रमुख सचिन बासरे, महानगरप्रमुख विजय साळवी, रवी कपोते, उपनेते अल्ताफ शेख, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे, महिला आघाडीच्या विजया पोटे, राधिका गुप्ते, आशा रसाळ, रेखा जाधव इत्यांदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे शिंदे गटाबरोबर गेलेले काही नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. गेल्या पंचवीस वर्षांनंतर प्रथमच एवढ्या प्रचंड संख्येने कल्याण शिवसेनेचे वर्धापन दिन साजरा झाल्याची चर्चा होती. एकप्रकारे बंडखोरांना लगावलेली ही एक सणसणीत चपराकच लगावल्याची भावना यासमयी व्यक्त करण्यात आली.
