
ठाणे , दि.3 : अन्न व औषध प्रशासन आणि नवी मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापुर येथे नवी मुंबई महानगरपालिकेमधील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांची (UN) फूड अँड अॅग्रिकल्चर ऑरगनायझेशन (FAO) यांनी सन 2022 -23 हे वर्ष “भरडधान्य वर्ष (इंटरनेशनल इयर ऑफ मिलेटस)” म्हणून जाहीर केलेले आहे. यानिमित्ताने कार्यशाळा, प्रात्यक्षिके व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सहायक आयुक्त अशोक पारधी व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
अन्न गुणवर्धन प्रात्यक्षिक (फुड फोर्टीफिकेशन)
या कार्यक्रमात अन्न गुणवर्धन संसाधन केंद्र, नवी दिल्ली येथील अन्न गुणवर्धन विषयाचे तज्ञ श्री नीलेश गंगावरे यांनी तांदूळ, गव्हाचे पीठ व दूध यातील गुणवर्धनाचे प्रात्यक्षिकातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सुरेश देशमुख, सहआयुक्त कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन यांनी प्रशासनाची कार्यपद्धती अन्न भेसळीबाबतचे गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या प्रश्नांचे निरासन केले.
वर्कशॉप इट राईट स्कूल
‘ईट राइट स्कूल’ या उपक्रमाबाबत सहायक आयुक्त (अन्न) तथा स्टेट नोडल ऑफिसर श्री दिगंबर भोगावडे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या 152 शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळेमधील व मुलांमधील स्वच्छता जसे मुलांना हात धुण्यासाठी handwash उपलब्ध करून देणे, मुलांनी स्वच्छ कपडे घालणे, तसेच तृणधान्य व पौष्टीक अन्न पदार्थांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
भरडधान्य (मिलेटस) बाबतजनजागृती
या कार्यक्रमास शासकीय रुग्णालय, ठाणे येथील आहारतज्ञ डॉ प्रिया गुरव यांनी ज्वारी, बाजरी,वरी, कोडो, नाचणी, राळा, कांग, कुटू, राजगिरा, संनवा अशा असख्य भरडधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. तृणधान्ये केवळ भाकरीसाठीच वापरता येतात असे नाही, तर त्यापासून उपमा, खीर, आंबील, डोसे, इडली, पुलाव, खिचडी, असे अनेक पदार्थ करता येतात, असे त्यांनी सांगितले. तसेच कलादर्पण स्वयंसहायता बचतगट यांनी भरडधान्य यांच्या विविध पाककृतींचे प्रदर्शन केले व अन्नपदार्थ चव घेण्यासाठी देऊन महत्व विशद केले.
टेस्ट युअर फूड
या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उपस्थिताना खाद्यपदार्थतील भेसळ बाबत विविध प्रात्यक्षिके औषध प्रशासन प्रयोगशाळा, मुंबई येथील अन्न विश्लेषक रोशनी खंदारे व त्यांच्या टीमने दाखवली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार यांनी नवी मुंबईतील शाळांना ‘ईट राइट स्कूल’ प्रमाणपत्र मिळेल, अशी आशा व्यक्त केली व सर्व उपक्रमास महापालिकेचे सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास दोनशेहून अधिक मुख्याध्यापक व अन्न व्यावसायिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्न सुरक्षा अधिकारी दीप्ती हरदास यांनी केले.
