ठाणे, दि. 24 (जिमाका) : – येत्या काळात विविध सण, उत्सव व स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून दि. 6 सप्टेंबर पर्यंत खालील कृत्यांना मनाई आदेश लागू केला असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविली आहे.
याकालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात
येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे / प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे / प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल असे कृत्य. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहिर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये करण्यास या आदेशाने मनाई करण्यात आली आहे.
हे आदेश लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा / मिरवणुका, सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण यांना लागू राहणार नाहीत.
हा मनाई आदेश दि. २३ ऑगस्ट २०२२ रोजी ००:०१ वाजेपासून ते दि. ०६ सप्टेंबर २०२२ रोजी २४.०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.
