कल्याण, दि. २९ ऑगस्ट, भाग्यश्री रासने(प्रतिनिधी) : शिक्षक आमदार प्रभाकर अनंत संत यांचे २९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ४ वाजता वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धपकाळाने राहत्या घरी निधन झाले. संत हे कल्याण पश्चिमेतील लेले आळीत राहत होते. त्यांचा जन्म अहमदनगर येथील अकोले येथे झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी बी.ए. एम.एड. पर्यंतचे शिक्षण घेतले होते. १९८२ ते १९८८ या कालावधीत ते शिक्षक आमदार होते. शहरातील तसेच खेडयापाड़यातील मुलांना शालेय शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.वर्षाला एक शाळा असे १२ शाळा सुरु केल्या होत्या. एका तपात शाळा सुरु करणारे ते एकमेव शिक्षक आमदार होते.
कल्याणात अभिनव,नूतन ज्ञानमंदीर या शाळा संत यांनी सुरु केल्या. अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली. शहापुर, पड़घा येथे शाळा सुरु करून तेथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. डोम्बिवलीत कन्या शाळा संत यांनी सुरु केली.
कल्याण पंचक्रोशित महाराष्ट्र साहित्य परिषद रुजविन्याचे काम केले. साहित्य व शिक्षण याविषयी त्यांना विशेष प्रेम आणि जिव्हाळा होता, त्यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिले.त्यांच्या निधनाने साहित्य व शिक्षण क्षेत्राला हानी झाली आहे. एक अनुभवी ज्येष्ठ व्यक्ति गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री कल्याणच्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
