ठाणे, दि. 06 : – ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दि. 7 सप्टेंबर 2022 रोजीचे 00.01 ते दि. 21 सप्टेंबर 2022 रोजीचे 24.00 वा.पर्यंत मनाई आदेश लागू केले आहे, असे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.
कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण यांना लागू राहणार नाही, असे श्री. पठारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
