ठाणेः 6 सप्टेंबर, चित्रलेखा (प्रतिनिधी) : ठाकुर्ली आणि कल्याणजवळील पत्रिपुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या. लाइनमनच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा अपघात टळला आहे. ट्रक फ्रॅक्चर (रुळाला तडा) गेल्याचे लाइनमनच्या लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले.
सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास हे उघडकीस आले. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या. त्यामुळे लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यातe आली होती. घटनास्थळी रेल्वेचे तांत्रिक विभागाचे कर्मचारी जाऊन त्यांनी ट्रॅक दुरुस्ती केली. सकाळी ७.१५ च्या सुमारास वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हळूहळू डाऊन जलदमार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली. पण सकाळच्या या घोळामुळे प्रवाशांचे हाल झाले.
लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी ताटकळले. तसेच कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. तासभर गाड्यांना विलंब झाला. लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला. कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान रेल्वे गाड्या उशीरानं धावणार असल्या तरी लाइनमनस दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. त्यामुळे दोन्ही लाइनमनचेही कौतुक केलं जात आहे.
