अहमदनगर, दि. 23 सप्टेंबर (प्रतिनिधी) : नगर आणि बीडच्या नागरिकांसाठी महत्वाची असलेली परळी-बीड-नगर रेल्वे आज पहिल्या टप्यातील मार्गावर म्हणजेच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे.
त्यामुळे बीड जिल्हावासियांचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. आज सकाळी 11 वाजता परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी प्रवासी रेल्वेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
आजपासून अहमदनगर ते आष्टी अशा 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे सुरु होत आहे. नगर ते आष्टी प्रवासी रेल्वेचा शुभारंभ आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे व पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणार आहे. तर आष्टी, पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड या तालुक्यातील नागरिकांना नगर, पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा फायदा होणार आहे.
त्यामुळे या तालुक्यातील उद्योगधंद्यास चालना मिळणार आहे. दरम्यान, अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा विषय कायम चर्चेत राहिलेला आहे. तर अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. तर आत्ता नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे.
