वॉशिंग्टन, दि. 27 सप्टेंबर (प्रतिनिधी) : आजचा दिवस संपूर्ण पृथ्वीवासियांसाठी ऐतिहासिक दिवस मानला जातो. नासानं आज सकाळी इतिहास रचून एक मोठा विक्रम केला आहे. पृथ्वीला लघुग्रहांपासून वाचवण्या साठी अंतराळ संस्थेने यशस्वी चाचणी घेतली. या अंतर्गत त्यांचे डार्ट मिशन पार पाडले. लघुग्रहाची दिशा आणि वेग बदलण्याचा नासाचा प्रयोग यशस्वी झाला. भविष्यात अशाप्रकारचं कोणतंही संकट पृथ्वीवर आल्यास त्याचा मुकाबला यशस्वीरित्या करता येणार आहे.
नासाचे मिशन डार्ट यशस्वी झाले आहे. फुटबॉल स्टेडियमच्या समतुल्य असलेल्या डिमोफोर्सशी अंतराळयान आदळताच, प्रोजेक्ट डार्टशी संबंधित नासाच्या टीमने आनंदाने उडी घेतली. हा असा क्षण होता जेव्हा शास्त्रज्ञांनी उत्सव साजरा केला. टक्कर होताच त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
नासाला प्रोजेक्ट डार्टच्या माध्यमातून हे पाहायचं होतं की, लघुग्रहावर अवकाशयानाच्या टक्करचा काही परिणाम होतो की नाही? अंतराळयानाच्या टक्करमुळे लघुग्रहाच्या दिशेवर आणि वेगावर परिणाम होतो की नाही? सविस्तर अहवाल आल्यानंतरच या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
नासाच्या शास्त्रज्ञांना खात्री आहे की अंतराळयानाच्या टक्करमुळे डिमॉर्फोसवर नक्कीच परिणाम झाला. इम्पॅक्ट सक्सेसचाही अर्थ असाच होतो, पण किती परिणाम झाला याबाबत नासाचा अहवाल लवकरच समोर येईल. भविष्यात लघुग्रहांमुळं पृथ्वीवर संकट येऊ शकतं. अशा स्थितीत पृथ्वीला वाचवण्यासाठी आता यशस्वी झालेल्या मिशन डार्ट कामी येऊ शकतं. पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या लघुग्रहाला अंतराळयानानं धडक देऊन त्याची दिशा आणि गती बदलली जाऊ शकते हे आजच्या प्रयोगामुळे दिसून आलं आहे.
