मुंबई, दि. 29 सप्टेंबर (प्रतिनिधी) : आता पासपोर्ट बनवणं आणखी सोपं होणार आहे. केंद्र सरकारने या नियमात बदल केले आहेत. हे नियम आजपासून देशभरात लागू होणार आहे. पासपोर्ट मिळवण्यासाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच पीसीसीच्या मंजुरीमध्ये अधिक वेळ जात असे. आता मात्र परराष्ट्र मंत्रालयानं हेच लक्षात घेत त्यावर तोडगा काढला आहे.
आता पासपोर्ट अर्जदार सर्व ऑनलाईन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळं अर्जदारांच्या वेळेची बचत होऊन लवकरात लवकर पासपोर्ट अर्जदारांना मिळणार आहे.
आजपासून नवीन नियमानुसार पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नागरिक ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांद्वारे हा अर्ज करू शकतात. त्यापूर्वी याबाबत निवेदन जरी करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं की, गेल्या काही महिन्यांपासून पासपोर्ट बनवण्यासाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या (पीसीसी) मागणीत सातत्याने वाढ होतेय.
त्यामुळं ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रातून पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. यातच पोलीस मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया अनिवार्य आहे, कारण अर्जदाराच्या गुन्हेगारी नोंदी जर असतील तर, त्यांना पासपोर्ट मिळू देण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे.
आपण आपल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पासपोर्टसाठी अर्ज करता येतो. यासोबतच या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी देखील केली जाते. आपण सांगितलेल्या पत्त्यावर पोलीस भेट देतात आणि तिथे जाऊन तुमच्या कागदपत्रांची माहिती घेतात. याशिवाय आजूबाजूला तुमच्याबद्दल माहिती मिळवतात.
