मुंबई, दि. 29 सप्टेंबर (प्रतिनिधी) : घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार ग्राहकाला वर्षभरात केवळ 15 सिलिंडरच मिळणार आहेत. तसंच एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला असून ग्राहकांना महिन्यात दोन पेक्षा जास्त सिलिंडर घेता येणार नाहीत.
दरम्यान यापूर्वी घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना केव्हाही आणि वर्षभर लागलीत तेवढे सिलिंडर घेता येत होते. मात्र नव्या नियमांनुसार फक्त 15 सिलिंडरच मिळणार आहेत. अनुदानित घरगुती गॅस हे व्यावसायिक गॅस सिलिंडरपेक्षा महाग आहे. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होऊ लागला. याबाबतची माहिती उघड झाल्यांनतर व तक्रारी समोर आल्यानं घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला गेला.
नवा नियम लागू करण्यात आला असून तीनही तेल कंपन्यांकडून आता मर्यादीत संख्येनुसार सिलिंडर दिले जातील. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी असणाऱ्या ग्राहकांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळतील. तर यापेक्षा जास्त सिलिंडरची आवश्यकता असेल तर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत.
रेशनिंग अंतर्गत एक ग्राहक महिन्यात फक्त दोन घरगुती गॅस सिलिंडर घेऊ शकतो. तसंच कोणत्याही परिस्थितीत वर्षभरात १५ पेक्षा जास्त सिलिंडर घेता येणार नाहीत. एखाद्या ग्राहकाला जास्त गॅस लागत असल्यास त्याचा पुरावा देऊन तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच अतिरिक्त रिफिल मिळेल.
