मुंबई, दि. 4 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी ‘गिफ्ट’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. चार वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च सरकार करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यात शिधापत्रिका धारकांना दिवाळीनिमित्त दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक शिधापत्रिका धारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.
हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येणार आहे. त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी ४८६ कोटी ९४ लाख रुपये खर्च येणार आहे. शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
