मुंबई, दि. 5 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : मी मुख्यमंत्री असलो तरी तुमच्या सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आमच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या भूमिकेला राज्यभरातून प्रतिसाद भेटतो आहे. आज गर्दीचा महासागर उसळा आहे. खरी शिवसेना कुठंय हे साऱ्या महाराष्ट्राला आणि देशाला या महासागरातून समजलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार कोण आहे? हा प्रश्व यापुढे कोणालाही पडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. मैदान कोणाला द्यायचं, यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही हे ठरवलं होतं. सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज केला होता. मैदानही आम्हाला मिळालं असतं. परंतु राज्याचा मुख्यमंत्री कायदा सुव्यस्था राखण्याची जबाबदारी माझीच आहे. मैदान जरी मिळाले तरी बाळासाहेबांचे विचार आमच्यासोबत आहेत. त्यांची भूमिका आमच्यासोबत आहेत, असे शिंदे म्हणाले.
ही परंपरा तुम्ही मोडीत काढली. सत्तेच्या हव्यासा पोटी हिंदुत्वाच्या भूमिकेला तुम्ही मुठमाती दिली. बाळासाहेबांच्या विचाराला मुठमाती दिली. मग तुम्हाला त्या जागेवर बसण्याचा नैतिक अधीकार आहे का? हजारो शिवसैनिकांनी घाम, रक्त आटून पक्ष मोठा केला. तो पक्ष तुम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडे गहाण ठेवला. त्या सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रावादीच्या हातात होता. स्वाभिमान त्यांच्यापुढे गहाण ठेवला. त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हालाही नाचवायला लागलात. बाळासाहेबांच्या विचारासाठी, हिंदुत्वासाठी आम्हाला ही भूमिका घेतली, असे शिंदे म्हणाले.
राज्यभरात लोकांचा प्रचंड प्रतिसाद भेटतो आहे. सभेला गर्दी होतेय. जर आम्ही चुकलो असतो तर एवढ्यासंख्येने तुम्ही इथे जमला असता का? आम्ही जे केलं ते जनतेच्या हितासाठी केलं. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, फक्त बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आम्ही आहोत, हे महाराष्ट्राला समजलं आहे, अशी घाणाघाती टीका एकनाथ शिंदेंनी केली.
गद्दरी झाली ती 2019 साली. महाविकास आघाडी केली तीच गद्दारी होती. बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली. जनतेने महायुती म्हणून निवडून दिलं आणि महाविकास आघाडी म्हणून सरकार केलं हीच गद्दरी होती. म्हणून जनतेचा तुम्ही विश्वासघात केला आहे. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी पण तुम्ही तर बापाचे विचार विकणारे आहात. तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही बाप विकणारी टोळी आहात का? खरे गद्दार कोण हे जनेतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्यासोबत आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
