औरंगाबाद, दि. 11 (प्रतिनिधी) : अ.भा.सो.क्ष. कासार समाज मध्यवर्ती मंडळ व महाराष्ट्र कला साहित्य कोअर कमिटी आयोजित या गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा, तापडिया नाट्यमंदिर, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दि 06/11/22 ला संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सहकार मंत्री मा. श्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या स्पर्धेतून इंडियन आयडॉल सारख्या स्पर्धेत कासार समाजाचे गायक सहभागी व्हावे व कासार समाजामध्ये सेलिब्रिटी निर्माण व्हावेत अशा प्रेरणादायी शुभेच्छा मा. मंत्री श्री अतुल सावे यांनी दिल्या.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 488 स्पर्धकांनी प्राथमिक फेरीत भाग घेतला होता. मुंबई , पुणे ,नाशिक, संभाजीनगर व अमरावती येथील उपांत्य फेरीमध्ये प्रत्येक विभागातून 6 ,असे एकूण 30 स्पर्धक महाअंतिम फेरीसाठी निवडले गेले. मागील 4 महिन्यांमध्ये या सर्व स्पर्धकांनी यशस्वी होण्यासाठी अखंड परिश्रम घेतले. एकापेक्षा एक बहारदार गाण्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या कार्यक्रमाने सर्व मान्यवर, रसिक श्रोते व परीक्षकांची मने जिंकली. सकाळी 10 ला सुरू झालेला हा संगीतमय सोहळा सायंकाळी 8 पर्यंत चालू होता. स्पर्धकांच्या अप्रतिम गायनाने श्रोत्यांना खुर्चीला खिळवून ठेवले होते. लहान गटाची कासार आयडॉल विजेती, 5 वर्षाची चिमुरडी, अर्णवीने आपल्या सुंदर निरागस गायनाने सर्वांची मने जिंकली व तिला सर्वांनी उभे राहून प्रोत्साहन दिले. 5 वर्ष ते 72 वर्ष वय असलेल्या स्पर्धकानी या कार्यक्रमात सुंदर 29 Solo व बहारदार 16 Duets गाणी सादर केली.
मध्यंतरानंतर सिने अभिनेत्री कु.अश्विनी कासार यांची श्री केशव कुंभकर्ण यांनी खुमासदार शैलीत घेतलेली प्रकट मुलाखत लक्षवेधी व सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली. जी व्यक्ती आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबाचा, समाजाचा विचार करते तीच आयुष्यात पुढे जाते. स्पर्धा ही इतरांशी असू नये, तर ती स्वतःशीच असावी , असे उद्गार “सुख म्हणजे नक्की काय असते ” फेम प्रसिद्ध अभिनेत्री कु. अश्विनी कासार हिने काढले. कासार आयडॉल या स्पर्धेने कासार बांधवांना गायन क्षेत्रात उत्कृष्ट संधी निर्माण केली आहे, तसेच आजचे 30 स्पर्धक हे 30 कासार आयडॉल आहेत, असे मत अ भा सो क्ष कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष श्री शरद भांडेकर यांनी व्यक्त केले. प्रत्येकाने कला जपली पाहिजे व आजचा कार्यक्रम अतिशय उच्च दर्जाचा झाला अशी भावना अ भा सो क्ष कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री आनंद डांगरे यांनी व्यक्त केली. आमचे समाज बांधव हे कष्टकरी, मेहनती, व प्रामाणिक आहेत असे प्रतिपादन संभाजीनगरचे मा. महापौर श्री बापूजी घडामोडे यांनी केले. संभाजीनगर मध्ये कासार समाजाने भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून आम्हाला सुंदर संगीतमय मेजवानी दिली , कासार समाजातून प्रतिभावान गायक तयार व्हावेत ,कासार समाजाच्या मदतीसाठी शासन दरबारी प्रयत्न करू असे , पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी भारताचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. डॉ भागवत कराड यांनी जाहीर केले. या स्पर्धेत विजेता ठरवणं हे एक आव्हान होतं असे मत स्पर्धेचे मान्यवर परीक्षक श्री राहुल खरे (विजेता गौरव महाराष्ट्राचा) व सौ सरला शिंदे (प्रख्यात पार्श्वगायिका) यांनी व्यक्त केले.
मोठा गट कासार आयडॉल 22 विजेती सौ. अमृता कुंभकर्ण यांना गोवा टूर्स चे पॅकेज व लहान गट विजेती कु.अर्णवी अंबडकर यांचा करंडक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपविजेते चि.राज कासार, चि.अक्षय वाघ , चि.श्रीहरी ढोले , कु. रेवा कासार, कु. शाश्वती कुंभकर्ण, चि.आयुष्य अक्कर यांनाही करंडक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कासार आयडॉल2021 चे विजेते श्री गणेश शिलवंत, कु. प्रांजल कासार , श्री अक्षय मुळे यांनी संपूर्ण स्पर्धेत सर्व स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन केले, स्पर्धकांना भरपूर मदत केली. त्यांच्या निवडक गाण्यांचे महाअंतिम सोहळ्यात सादरीकरण केले. कार्यक्रमाचे लक्षवेधक व खुमासदार सूत्रसंचालन श्री केशव कुंभकर्ण, श्री कैलास चौथे व कु स्मिता धारूरकर यांनी केले. संगीतसंयोजन श्री जीवन कुलकर्णी व त्यांची टीम , कीबोर्ड राजू जगधने, मिलिंद डोलारे, ऑटो पॅड विनोद, गिटार अजय तायडे, कासार समाजाचे बासरीवादक प्रथमेश पोफळे यांनी संगीत नियोजन केले. रंगमंच व्यवस्था राजेंद्र सुपेकर,साऊंड क्रिस्टल साऊंड,प्रकाश योजना सतीश मस्के यांनी केली. आशिष तांबटकर यांनी रंगमंचावर मेगास्क्रीनची व्यवस्था केली. श्री सुनील गोरे यांनी फोटोग्राफी ची बाजू सांभाळली. औरंगाबादचे राजराजेश्वरी कालिका महिला मंडळ उत्कर्ष मंडळ, औरंगाबाद मध्यवर्ती मंडळ, जालना मध्यवर्ती मंडळ व कासार साथी प्रतिष्ठान यांनी महाअंतिम सोहळा आयोजन केले.
कासार आयडॉल च्या प्राथमिक फेरी, विभागीय फेरी तसेच महाअंतिम सोहळा यशस्वी करण्यासाठी मा. महापौर श्री बापूजी घडामोडे, अ भा सो क्ष कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष श्री शरदजी भांडेकर, मध्यवर्ती मंडळाचे मुंबई, कोकण, विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा चे सर्व विभागीय पदाधिकारी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील कासार समाज बांधव यांनी हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरीव सहकार्य केले. सर्वांचे मनःपूर्वक आभार. कासार आयडॉल कोअर कमिटीचे सदस्य श्री केशव कुंभकर्ण, श्री अशोक जवकर, श्री योगेश कासार ,श्री देवराज गरगडे, कु. स्मिता धारूरकर , श्री मनीष चुटके यांनी संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेली चार महिने अखंड परिश्रम घेतले. या कार्यक्रमास अभूतपूर्व व शिस्तबद्ध उपस्थिती नोंदविणाऱ्या सर्व समाजबांधव, भगिनी, सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार !!

Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0