जामनगर, दि. 27 नोव्हेंबर (प्रतिनिधी) :
गुजरात विधानसभा निवडणुक आता देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपने अनेक ठिकाणहून हाय-प्रोफाईल लोकांना उमेदवारी दिली आहे. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा रवींद्र सिंग जडेजाच्या नावाचाही समावेश आहे. भाजपने त्यांना जामनगर उत्तरमधून तिकीट दिले आहे. पण आता इंटरेस्टिंग बाब म्हणजे जडेजाची बहीण नयनाबा गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहे.
‘भाजपने जामनगरमध्ये नवा चेहरा आणल्यास काँग्रेस जिंकेल’
नयनाबा यांनी काही दिवसापूर्वी म्हटले होते की, “मला वाटते की भाजपने नवा चेहरा आणला तर काँग्रेस विधानसभेतील ७८ क्रमांकाची जागा जिंकू शकते. नव्या चेहऱ्याला अनुभवाची कमतरता असेल, राजकीय समज कमी असेल, केवळ पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. मला वाटतं भाजपने नवा चेहरा आणला तर ही जागा काँग्रेस नक्कीच जिंकेल.” जामनगर उत्तर ही गुजरात विधानसभेची जागा क्रमांक 78 आहे, जिथून नयनाबाची मेहुणी अर्थात रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा भाजपच्या उमेदवार आहेत.
😊नयनाबा जडेजा काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. एकीकडे रिवाबाला पती रवींद्र जडेजाची साथ मिळते आहे, तर दुसरीकडे तिच्या बहिणीला तिचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा यांचा पाठिंबा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिवाबा गुजरातच्या राजकारणात सक्रिय आहेत. 2019 मध्ये त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर रिवाबाला यांना अनेकदा भाजपशी संबंधित राजकीय कार्यक्रमांमध्ये पाहिले गेले आहे. भाजपसोबतच त्या सौराष्ट्रच्या करणी क्षत्रिय सेनेच्या अध्यक्षाही होत्या.
