1 डिसेंबर (प्रतिनिधी)
गांधीनगर : आज गुजरात विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान सुरु झालंय. आज पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांमधील 89 जागांसाठी मतदान होतंय. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. आज पहिल्या टप्प्यात एकूण 2 कोटी 39 लाख 76 हजार 760 मतदार मतदान करणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 70 महिला उमेदवारांसह 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाचे 88 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही 57 उमेदवारांना तिकीट दिलंय. एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात फक्त 6 उमेदवार उभे केल्याचं पाहायला मिळतंय.
गुजरातमधील मतदान दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. आज दि. 1 आणि सोमवारी 5 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
2017 च्या गुजरात विधानसभा निवडणूक चूरशीची झाल्याची पाहायला मिळाली होती. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं पण तरीही तो सामना चुरशीचा झाला होता. भाजपनं 99 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं 80 जागांवर विजय मिळवला होता.
2017 ला बहुमत भाजपला मिळालं असलं तरी काँग्रेसनं भाजपला कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळालं होतं. 25 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. यंदाही भाजप गुजरातमध्ये सत्ता कायम ठेवणार का? हे आता निवडणुकीच्या निकालानंतरचं पाहायला मिळणार आहे.
