रशिया, दि. 2 डिसेंबर : युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले होते. अशा परिस्थितीत रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला. भारताने याचा फायदा घेत रशियाकडून मोठ्या सवलतीत कच्चे तेल विकत घेतले. भारत अजूनही रशियाकडून स्वस्त किंमतीत कच्चे तेल खरेदी करत आहे. आपला शेजारी देश पाकिस्तानही रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी गेला होता. परंतु पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
पाकिस्तान चे पेट्रोलियम मंत्री मुसादिक मुलिक रशियात भिक मागण्यासाठी गेले असताना पाकिस्तान ला ३०%-४०% सवलतीने भारता प्रमाणे क्रूड ऑईल देण्याची मागणी रशियाने सपशेल फेटाळून लावली.
रशियाचा हा सवलतीचा दर फक्त मित्र आणि मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल घेणाऱ्या देशांसाठी आहे. तुम्हाला आंतरराष्ट्रीय दराने क्रूड ऑईल विकत घ्यावं लागेल असं स्पष्ट केलं. भारताची आणि तुमची बरोबरी होऊ शकत नाही असं म्हणत पाकिस्तान ला त्यांची जागा दाखवून दिली.
एकीकडे आपल्याकडे सवलतीच्या दरात द्यायला ऑईल नाही असं पाकिस्तान ला सांगत असताना तिकडे भारताने एकट्या सप्टेंबर मधे तब्बल ८,९६,००० बॅरल/ प्रती दिवस रशियाकडून सवलतीच्या दरात ऑईल विकत घेतलेले आहे. यात प्रत्येक महिन्यात भर पडत आहे.
रशियाकडून सवलतीच्या दरात ऑईल मिळाल्यामुळे भारताने तब्बल ३५,००० कोटी रुपयांची बचत केली आहे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या शिष्टमंडळात पेट्रोलियम राज्यमंत्री मुस्सादिक मलिक, पेट्रोलियम सचिव मोहम्मद महमूद, मॉस्कोमधील पाकिस्तानच्या दूतावासातील संयुक्त सचिव आणि इतर अधिकारी यांचा समावेश होता. बुधवारी रशियन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही मागणी केली होती. आता गुरुवारी रशियाने कच्च्या तेलावर सूट देण्यास नकार दिला. वृत्तानुसार, चर्चा कोणत्याही ठोस निकालाशिवाय संपली. तसंच आपल्या निर्णयाची माहिती नंतर कूटनीतिक माध्यमातून कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
