ठाणे, दि.02 डिसेंबर :- समता पर्वानिमित्त समाज कल्याण विभागाच्या ठाणे जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने कल्याणमधील लक्ष्मण देवराम कॉलेजमध्ये युवा गट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील तरुणांना व्यवसायविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनण्यासंदर्भात व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बार्टी, आरईएसटीआय, जिल्हा कौशल्य विकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षणविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ठाणे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती राणे, इतर मागासवर्ग महामंडळाच्या श्री. देवकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सुबोधसिंह बायस, अग्रणी बँक (बँक ऑफ महाराष्ट्र) च्या झोनल अधिकारी सविता पावसकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करिता समाज कल्याण कार्यालय ठाणे येथील कर्मचारी जिल्ह्यातील सर्व समतादूत व प्रकल्प अधिकारी यांनी मेहनत घेतली.
