मुंबई, दि. 5 डिसेंबर (प्रतिनिधी) : चार दिवसांपूर्वी मुंबईतील एका उपनगरात कोरियन यूट्युबर तरुणीचा दोन तरुणांनी विनयभंग केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पण याच यूट्युबरच्या मदतीला अर्थव आणि आदित्य हे दोघे धावून आले. या तरुणांचे खास आभार या तरुणीने मानले आहेत.
कोरियाची प्रसिद्ध यूट्युबर असलेली एक तरुणी मुंबईत आली आहे. मुंबई उपनगरातील खार भागातील एका रस्त्यावर ती लाइव्ह स्ट्रिमिंग करत होती. त्याचवेळी तेथे दुचाकीवरून दोघे आले. त्यातील एकाने या यूट्युबरशी जबरदस्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. तरुणी मात्र या दोघांना टाळून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होते. ते दोघे दुचाकीवरून तिचा पाठलाग करून जबरदस्ती करू लागले होते. तेथून अथर्व हा जात होता. त्याने हा प्रकार बघितला. त्याने छेड काढणाऱ्या दोघा तरुणांना रोखले. त्यानंतर यूट्युबरला जवळच असलेल्या तिच्या हॉटेलपर्यंत पोहोचविले होते.
या तरुणीच्या लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये तिच्याबरोबर झालेल्या गैरवर्तनाचा प्रकार आला होता. सोशल मीडियावर हे व्हायरल झाले होते. तरुणीबरोबर होत असलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ आदित्य याने बघितला, त्याने ट्वीटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविला आहे. त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून कारवाईला सुरुवात करत गैरवर्तन करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली.
संकटाच्या काळात मदतीला आलेल्या तरुणांचे तरुणींनी आभार मानले आहेत. तिने दोघांनाही हॉटेलमध्ये जेवणासाठी खास आमंत्रित केले होते. तिघांचा एकत्रित जेवणाचा फोटो तिने ट्वीट केला आहे. या फोटोची आता चर्चा होत आहे.
