नवी दिल्ली, दि. 8 डिसेंबर (प्रतिनिधी) : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झालं. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला संपूर्ण गुजरातमध्ये मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे. सध्या सुरत पश्चिम मतदारसंघातून भाजपचे पूर्णेश मोदी आघाडीवर आहेत.
गुजरातच्या राजकीय रणांगणात, सुरत शहरातील 12 विधानसभा जागांमध्ये पश्चिम विधानसभा देखील येते. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांपासून ही जागा भाजपनं जिंकली आहे. सध्या या मतदारसंघातून भाजपचे पूर्णेश मोदी आमदार आहेत. 2017 मध्ये सुरतच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पूर्णेश मोदी दुसऱ्यांदा आमदार झाले होते.
सुरतच्या पश्चिम विधानसभा जागेच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर, या जागी आतापर्यंत भाजपला आशीर्वाद मिळालेत. 2002 मध्ये भाजपच्या भावना बेन चपटवाला या निवडणुकीत विजयी झाल्या. किशोर व्यंकवाला हे 2007 आणि 2012 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. पण 2013 मध्ये किशोर भाई यांचं आजारपणामुळं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे पूर्णेश मोदी विजयी झाले. यानंतर 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही पूर्णेश मोदींनी विजय मिळवला. पश्चिम विधानसभा मतदारसंघ ही मुळात सुरतमधील रहिवाशांचं वर्चस्व असलेली जागा आहे.
