नवी मुंबई, प्रदीप मुरूडकर(प्रतिनिधी) : नवी मुंबई पोलीस दलाच्या विविध पथकांनी मिशन ऑल आऊट अंतर्गत एकाच दिवशी ४१ विविध अवैध व्यवसायांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये ८५ टक्के अवैध मद्याचा व्यवसाय तर बाकीचे विना परवानगी गुटखा आणि विदेशी सिगारेट विक्री, गांजा सेवन व जुगार अड्ड्यांवर छापे टाकले गेले.
पोलिसांच्या धाडीत खारघर मधील किराणा मालाच्या दुकानात तब्बल ९७ हजारांचा मद्यसाठा जप्त केला गेला. या परिसरात दारूबंदी नाही हेच या कार्यवाहीत समोर आले. तळोजात सिडको गृहनिर्माण करणाऱ्या शिर्के कंपनीच्या मजुरांच्या शिबिरातील दुकानात २० हजारांपेक्षा अधिकचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
मिशन ऑल आऊट आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ) अंतर्गत, न्हावाशेवा परिसरात तीन, उरण एक, तळोजा तीन, पनवेल तालुका आठ, पनवेल शहर एक, कळंबोली एक, खांदेश्वर तीन, खारघर दोन, सीबीडी एक, एनआरआय दोन, सानपाडा तीन, तुर्भे पाच, एपीएमसी एक, वाशी एक, कोपरखैरणे एक, रबाळे चार आणि रबाळे एमआयडीसी एक ठिकाणावर छापे टाकण्यात आले.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यातील अवैध मद्यसाठ्यांवर हद्दीबाहेरील पोलीस पथकाने छापे टाकले आहेत. आयुक्त भारंबे यांच्या नवी मुंबईत पदभार स्वीकारल्यानंतर पोलीसांनी एकाच दिवशी केलेली सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
