नवी मुंबई, दि. 1 फेब्रुवारी (प्रदीप मुरूडकर) : सोमवार, दि. 30 जानेवारी रोजी माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र
शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत विविध प्रलंबित मागण्या आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड व अन्य संबंधितांकडे सादर केलेली आहेत. अनेक वेळा संयुक्त बैठकाही झाल्या आहेत. संप, मोर्चे, उपोषणे यासारखी आंदोलने केली तरीही कामगारांचे प्रश्न दुर्लक्षितच आहेत. या प्रलंबित मागण्या आणि प्रश्नांकडे महाराष्ट्र शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांचा एक फेब्रुवारी रोजी एकदिवसीय संप पुकारला असल्याची माहिती स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, सरचिटणीस, माजी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी भवन, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या लक्षणीक संपाचे नोटीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सादर केले आहे. परंतु याबाबत सरकारने गांभिर्याने विचार केलेला नाही, म्हणून नाईलाजास्तव हा संप पुकारला जात आहे. असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात ३६ माथाडी मंडळे आहेत, बृहन्मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याकरीता एकूण ११ माथाडी मंडळे असून, या व अन्य मंडळाच्या पुनर्रचना झालेल्या नाहीत. या मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणुक करावी, सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, माथाडी कामगारांच्या कामाची मजूरी वेळोवर मंडळात भरणा न केल्यास ५०% दंड आकारणे, माथाडी कायदा व विविध मंडळांच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करणे, रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करणे, मे. टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथिल माथाडी बोर्डाच्या टोळी नं. ४९५ मधील माथाडी कामगारांच्या तसेच गुलटेकडी मार्केट, कोल्हापूर रेल्वे माल धक्क्यावर काम करणा-या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणा-या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करणे, पोलीस संरक्षणाचे नवीन परिपत्रक पोलीस यंत्रणेकडून काढण्यासंबंधी कार्यवाही करणे, मस्जिद बंदर परिसरातील वाहतुकीचे नवीन नियम रद्द करणे अथवा त्यात बदल करणे, बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी / तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे, नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील माथाडी / मापारी कामगारांच्या लेव्ही व अन्य प्रश्नांची सोडवणुक करणे, सिडकोमार्फत माथाडी कामगारांना नवीमुंबई परिसरात तयार घरे मिळणे, चेंबूर येथे माथाडी कामगारांच्या घरकुलासाठी दिलेल्या जमिनीवर झालेले झोपड्यांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणे आदी प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी राज्य शासनाकडे वारंवार आग्रह केलेला आहे, परंतु त्याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे तातडीने लक्ष दिले जावे, अन्यथा माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इषाराही माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला.
