
नवी मुंबई, प्रतिनिधी(प्रदीप मुरुडकर) : दैनिक सामना आणि झी मराठी यांच्या सहयोगाने शनिवारी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात महिलांसाठी विशेष माझा प्रस्तुत ‘उत्सव नात्यांचा’ या कार्यक्रमाचे दि.1 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. या वेळी झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका मधील नेत्रा (तितिक्षा तावडे) आणि रुपाली (ऐश्वर्या नारकर), अप्पी आमची कलेक्टर मधील अप्पी (शिवानी नाईक) आणि अर्जुन (रोहित परशुराम), दार उघडं बये मधील मुक्ता (सानिया चौधरी) आणि सारंग (रोशन चौधरी), तुला शिकवीन चांगलाच धडा मधील अधिपती (ऋशिकेश शेलार), या कलाकारांची उपस्थिती लाभली तसेच महिलांना कापसे पैठणी व इतर बक्षीसांची लयलूट करता आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजपाल वाघ यांनी केले.
दैनंदिन आपल्या कामात व्यस्त असणाऱ्या महिला या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कलाकारांसोबत खेळ, नृत्य करत त्यांनी घराची काळजी आणि काम यातुन थोडा वेळ का होईना विश्रांती घेतली होती. मंत्रमुग्ध होऊन त्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्यांच्या उत्साह, टाळ्या आणि शिट्या उपस्थित असलेल्या कलाकारांसाठी प्रोत्साहन ठरल्या.
नवी मुंबईतील महिलांचा उत्साह पाहता या कार्यक्रमाची शृंखला आम्ही प्रत्येक विभागात राबविणार आहोत, जेणेकरून महिलांना आपापल्या विभागातच पैठणी जिंकता येतील. अशी माहिती दैनिक सामनाचे राष्ट्रीय प्रमुख (व्यापार विकास) दिपक शिंदे यांनी दिली. पुढील कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी सामना वाचत रहा अशी विनंती त्यांनी वाचकांना केली.
