दिनांक: ५ एप्रिल,
प्रतिनिधी: प्रदीप मुरूडकर,
नवी मुंबई.
न्यू होरायझन स्कूल व न्यू होरायझन स्काॅलर स्कूल विरोधात विरोधात आज पालकांनी शाळेसमोर निदर्शन केले. नियमबाह्य फी वाढ व इतर अनेक समस्या घेऊन पालकांच्या संस्थेबरोबर बैठका झाल्या. पालकांनी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण अधिकाऱ्यांना अर्ज केला. त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यांकडून संस्थेला पत्रही देण्यात आले आहे. तरीही संस्थेकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही म्हणून पालकांनी शाळेसमोर हातात फलक घेवून निदर्शन केले.
टाळेबंदी काळात शासनाने सवलत दिलेली १५ टक्के फी पालकांकडून वसुल केली जात आहे. तसेच शिक्षक पालक संघ (पी. टी. ए.) ची स्थापना नियमबाह्य पद्धतीने केली आहे. असा आरोप पालकांनी संस्थेवर केला आहे. याशिवाय पहिली ते आठवी विद्यार्थांचा अभ्यासक्रम शाळा स्वतः ठरवते. पुस्तके आणि गणवेश विशिष्ट दुकानातुनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. ही पुस्तके एनसीईआरटी (राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) यापेक्षा वेगळी आणि महाग असतात. दरवर्षी १५ टक्के फी वाढ केली जाते. फी न भरल्यास दररोज १०० रूपये विलंब शुल्क आकारले जाते. ते न भरल्यास विद्यार्थ्यांचे शाळेचे दाखले, निकाल पत्र अडवून ठेवणे किंवा त्याला परिक्षेला बसून दिले जात नाही. विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जातो. या तक्रारींची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
