नवी मुंबई, दि. 5 ऑगस्ट 2025 : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी विश्वविद्यालयाच्या नवी मुंबई प्रमुख श्रीम. शिलादीदी व त्यांच्या सहका-यांनी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदास राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
राखी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण असून माणसा माणसा मधील नाते घट्ट करणारा उत्सव आहे अशा शब्दात रक्षाबंधन उत्सवाचे महत्व सांगत प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या श्रीम. शिलादीदी यांनी प्रबोधन केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणाव वाढला असून तो कमी करण्यासाठी अंतर्मुख होऊन स्वत:शी संवाद केला पाहिजे असे सांगत त्यांनी सहनशीलता आणि सामावून घेण्याची शक्ती हे दोन गुण तणावमुक्तीसाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. दैनंदिन व्यवहारात योगसाधनेची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, सहा.आयुक्त श्रीम. स्वरुपा परळीकर व श्रीम. शिल्पा देशपांडे, प्रशासकीय अधिकारी श्री. रवी जाधव आणि इतर अधिकारी, कर्मचारी यांना राखी बांधण्यात आल्या. विशेष म्हणजे महिला कर्मचा-यांनाही राखी बांधण्यात आल्या.
