ठाणे, दि. 21 एप्रिल 2026 :
आजच्या स्पर्धात्मक युगात महिला केवळ घरची जबाबदारी सांभाळून थांबल्या नाहीत, तर उद्योजकतेच्या क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. ठाण्यातील सौ. तेजस्विनी सचिन कुलकर्णी यांनी ‘अर्काया ऑप्टिक्स’ (Arkay Optics) या आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताची ओळख निर्माण करण्याचे धाडस दाखवले आहे. त्यांच्या या यशामागे जिद्द आणि राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा’ (CMEGP) मोलाचा वाटा आहे.
सौ. तेजस्विनी यांनी लेझर सर्जिकल फायबर उत्पादनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे ठरवले, मात्र कोणत्याही उद्योगासाठी भांडवल आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशा वेळी जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे त्यांच्या मदतीला धावून आले. केंद्राने आयोजित केलेल्या 10 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेतून त्यांना व्यवसायाचे बारकावे आणि शासकीय योजनांची सखोल माहिती मिळाली. पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक असलेल्या अर्ज प्रक्रियेमुळे त्यांना पंजाब नॅशनल बँकेकडून 40 लाख रुपयांचे कर्ज विनाविलंब मंजूर झाले. विशेष म्हणजे, या योजनेद्वारे त्यांना 10 लाख रुपयांचे अनुदानही प्राप्त झाले आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाचा पाया भक्कम झाला.
आज ‘अर्काया ऑप्टिक्स’ ही कंपनी केवळ नाविन्यपूर्ण उत्पादनेच तयार करत नाही, तर ती आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत आहे. उत्पादनाची गुणवत्ता टिकवण्यासाठी तेजस्विनी यांनी विदेशातून अत्याधुनिक यंत्रसामग्री आयात केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे फळ म्हणून आज त्यांचे उत्पादन केवळ भारतातच नव्हे, तर ब्राझील, मॉरिशस आणि नेपाळ यांसारख्या देशांमध्येही निर्यात केले जात आहे. 40 लाखांची वार्षिक उलाढाल गाठणाऱ्या या उद्योगातून त्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच इतर 8 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने ‘महिला सक्षमीकरणाचा’ आदर्श घालून दिला आहे.
भारतीय परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालत तेजस्विनी कुलकर्णी यांनी जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताचा ठसा उमटवण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या सांगतात की, शासनाच्या या योजनेमुळेच त्यांच्यातील उद्योजिकेला स्वप्न पाहण्याचे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचे बळ मिळाले. त्यांची ही यशोगाथा आज स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
