ठाणे, दि. 22 एप्रिल 2026 : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) ही देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणारी अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये उमेदवारांना 6 ते 9 महिन्याकरिता इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा रु.9 हजार एवढे विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये विविध आस्थापना मध्ये जसे की भारत पेट्रोलियम, नायरा एनर्जी लिमिटेड, तमिलनाड मर्कन्टाईल बँक, गिल इंडिया लिमिटेड, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, प्रेसिडेंट सिस्टम लिमिटेड, माझगावडॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड इ. नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध आहे.
या योजनेमुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी, व्यावसायिक नेटवर्क तयार होणे, आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकास यामध्ये वाढ होणे इत्यादी बाबींचा मोठा फायदा होणार आहे.
या योजनेचा तिसरा टप्पा (Round 3) सुरू असून, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा (PMIS) लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन रिक्तपदांसाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी इच्छुक https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्वरित अर्ज करावा. अधिकच्या माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधावा.
ठाणे जिल्ह्यातील जास्तीत-जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme / PMIS) योजना काय आहे.
ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना असून, जी युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव (practical experience) देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
ही योजना म्हणजे विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम शिकण्याची आणि काही प्रमाणात उत्पन्न मिळविण्याची संधी देणारी सरकारी योजना आहे.
ही योजना केंद्र सरकारने (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे) सुरू केली आहे.
यामध्ये तरुणांना देशातील टॉप 2 हजार कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते.
योजनेचे मुख्य उद्दिष्टेः
युवकांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे.
त्यांची स्किल्स (कौशल्ये) वाढवणे.
त्यांना नोकरीसाठी तयार करणे (employability वाढवणे)
शिक्षण आणि प्रत्यक्ष काम यामधील अंतर कमी करणे
लाभ (Benefits)
· प्रतिमहा सुमारे 9 हजार स्टायपेंड.
6 ते 9 महिन्यांची इंटर्नशिप.
· मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी.
अनुभवामुळे पुढे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
सदरचे विद्यावेतन हे थेट उमेदवाराच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे.
Life & Personal Accident Insurance देण्यात आला आहे.
एकवेळीचे विशेष अनुदान म्हणून उमेदवारास रु.6 हजार ची रक्कम DBT द्वारे 2 हप्त्यांत दिलीजाते- पहिले 15 दिवसांत रु.3 हजार आणि दुसरे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर रु.3 हजार इंटर्नशिपचे 15 दिवसांत दिले जातात.
उमेदवारास सरकारकडून प्रधानमंत्री जिवन जोती विमा योजना (PMJJBY) व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY) योजनांद्वारे विमा संरक्षण दिले जाईल आणि कंपनीकडून अतिरिक्त फायदेही मिळू शकतात.
पात्रता (Eligibility साधारण)
वय साधारण 18 ते 25 वर्षे.
दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, पदवी, पदवीधर, बी.ई., बी.टेक, इ. आहे.
भारतीय नागरिक असणे आवश्यक.
सध्या फुल-टाईम नोकरी नसावी.
अर्ज कसा करावाः
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा (PMIS) लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
उमेदवाराची नोंदणी पूर्ण झाल्यावर नामांकित कंपनीतील रिक्तपदांसाठी अर्ज करता येईल.
ज्या उद्योजकांना प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने अंतर्गत उमेदवार भरती करावयाचे आहेत, अशा उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी कळविले आहे.
