ठाणे, दि.29 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाअंतर्गत जिल्ह्यातील 85 प्राप्त झाली आहेत. या प्रकरणांना गती देण्यासाठी व वित्त पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने दिनांक 3 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात 3 जानेवारी रोजी बँक व्यवस्थापक, जिल्हा संसाधन व्यक्ती, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी कळविली आहे.
ही कार्यशाळा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रोड नं.१६, कृषि भवन, वागळे ईस्टेट, ठाणे येथे होणार आहे. यामध्ये सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे ते कर्ज मंजुरी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेस जिल्ह्यातील इच्छुक उत्पादक शेतकरी, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था/गटांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी केली आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाअंतर्गत जिल्ह्यातील वरी, नागली उत्पादनावर आधारित वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट, सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतीशील शेतकरी हे भाग घेऊ शकतात. या योजनेत सहभागी उद्योगांना शासनाकडून अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 76 प्रकरणे ऑनलाईन व 9 प्रकरणे बँकेकडे अशी एकूण 85 प्रकरणे प्राप्त झाली आहेत. या अर्जांच्या सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे, बँक मंजुरीस गती देणे यासाठी येत्या 3 ते 18 जानेवारी या कालावधीत कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरी पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ठाणे जिल्ह्यास वैयक्तिक लाभार्थ्याचे 148 तर गटासाठी 15 लक्षांक प्राप्त झाले आहे. वैयक्तिक तथा गटासाठी योजनेत सहभागी होण्यासाठी http://pmfme.mofpi.gov.in Portal वर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी ९४०३०१६८३७/ ९७६९५८६५२६/ ९४२२१३२३१५ वर संपर्क करणे अथवा dsaothanesmart@gmail.com व dsaothane.2021@gmail.com वर किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन श्री.माने यांनी केले आहे.
