भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्ताने स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) आणि जल जीवन मिशन अंतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
ठाणे, दि.२९ : जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून ग्रामीण भागात ‘जल जीवन मिशन’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ हे दोन अभियान राबविण्यात येत आहेत. ‘जल जीवन मिशन’ च्या माध्यमातून प्रत्येक घरात नळ जोडणी करून प्रती माणसी ५५ लीटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून सांडपाणी घनकचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून गावं स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे दोन्ही अभियान मिशन मोडवर राबवून शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. त्यामुळे या अभियानाला गती मिळण्यासाठी या अभियानाशी निगडीत सर्व यंत्रणांची जिल्हास्तरीय कार्यशाळा बुधवारी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्ताने स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) आणि जल जीवन मिशन अंतर्गत संपन्न झालेल्या या कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे , उपाध्यक्ष सुभाष पवार, स्वच्छ भारत मिशनचे सहसचिव तथा अभियान संचालक अभय महाजन, स्वच्छ भारत मिशनचे प्रकल्प संचालक रवींद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राधेश्याम आडे, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
