नवी दिल्ली, 7 सप्टेंबर चित्रलेखा रासने (प्रतिनिधी) :
देशाची राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट हा रस्ता आता ‘कर्तव्य पथ’ म्हणून ओळखला जाणार आहे. नवी दिल्ली नगरपरिषदेच्या विशेष सभेने बुधवारी त्याचे नाव राजपथवरून बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
एनडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून प्राप्त झाला आहे, त्यानंतर परिषदेच्या बैठकीतही त्याला मंजुरी देण्यात आली.
एनडीएमसीच्या सदस्य मीनाक्षी लेखी यांनी सांगितले की, एनडीएमसी कौन्सिलच्या विशेष बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. भाजपचे लोकसभा खासदार लेखी म्हणाले की, “आम्ही विशेष परिषदेच्या बैठकीत राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ करण्याचा ठराव मंजूर केला आहे.”
एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले की, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाला आहे. ते म्हणाले की, आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला ‘कर्तव्य पथ’ म्हटले जाईल.
