नाशिक, दि. 29 सप्टेंबर (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात कोथिंबिरीला सोन्याचा भाव आल्याचं पाहायला मिळतंय. कोथिंबिरीचे दर दिवसेदिवस वाढताहेत. बाजारात आवक कमी झाल्यानं कोथिंबिरीला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात तब्बल 200 रुपयांना विकली जात आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळं भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं भाज्यांचे दर वाढल्याचं दिसत आहे.
मार्केटमध्ये कोथिंबिरीची आवक कमी झाल्यानं भाव मिळत आहे. जवळपास 160 रुपयांची जुडी एवढा भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना किरकोळ बाजारात 200 रुपयांना कोथिंबिरीच्या जुडीची विक्री होत आहे. यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असतानाच सर्वसामान्यांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे.
नाशिकमध्ये सध्या पावसानं उघडीप दिली आहे. जिल्ह्यात मात्र मागील पावसामुळं भाजीपाल्याची अवस्था खराब झाली आहे. नियमित होणाऱ्या कोथंबिरीच्या आवकवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर देखील चांगलेच कडाडल्याचं पाहायला मिळताहेत. बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्या आवाक्याबाहेर गेल्याचं पाहायला मिळताहेत.
