नाशिक, दि. 30 सप्टेंबर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी गडावर बोकड बळी बंदी उठवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने गुरुवारी हा निर्णय दिला आहे.
एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हायकोर्टाने सप्तश्रृंगी गडावर बोकड बळीची प्रथेला अटीशर्तीसह परवानगी दिली आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर तब्बल पाच वर्षांनी बंद पडलेली बोकड बळीची प्रथा यंदाच्या नवरात्रौत्सवापासून पुन्हा सुरू होणार आहे.
कधीपासून बंद होती बोकड बळीची प्रथा…सन 2017 पासून सप्तश्रृंगी गडावरील बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती. दरम्यान, 11 सप्टेंबर 2016 रोजी दसरा होता. यादिवशी परंपरेनूसार गडावर बोकडाचा बळी दिला जात होता.
न्यासाच्यावतीने मानवंदना देताना झाडण्यात आलेल्या बंदुकीतून उडलेल्या छऱ्यामुळे 12 भाविक जखमी झाले होते. त्यामुळे भविष्यात बोकड बळीच्या प्रथेमुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सप्टेंबर 2017 पासून गडावर बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती.
मात्र, या निर्णयाविरुद्ध आदिवासी विकास सोसायटीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. बोकड बळीची प्रथा बंद केल्या विरुद्ध आदिवासी विकास सोसायटीने जनहित याचिका दाखल केली होती. आता हायकोर्टाने तब्बल पाच वर्षांनी आदिवासी सोसायटीच्या बाजूने निकाल दिला आहे.
