मुंबई, दि. 4 नोव्हेंबर : कोरोनाच्या संसर्गामुळे जवळपास संपूर्ण वर्ष शाळा बंद असलेल्या २०२०-२१ या वर्षांत राज्य हे शालेय शिक्षणिक स्थितीच्या प्रतवारीत सर्वोत्तम ठरले. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ आणि पंजाबही हजारपैकी ९२८ गुण मिळवून प्रथम स्थानी आहे.
केंद्रीय शिक्षण विभागाकडून दरवर्षी अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रवेश, समन्याय आणि प्रशासकीय कार्यप्रणाली अशा पाच निकषांनुसार राज्यांची शालेय शिक्षणाची प्रतवारी परफॉर्मन्स ग्रेिडग इंडेक्स जाहीर करण्यात येते.
यातील सर्व निकषांमध्ये मिळून ७० मापदंड निश्चित करण्यात आले. त्यासाठी केंद्राच्या विविध योजनांच्या संकेतस्थळावर शाळांनी नोंदवलेली माहिती विचारात घेण्यात येते. यापूर्वीच्या म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांतील प्रतवारीनुसार राज्याला देशात आठवा क्रमांक होता.
मात्र, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत राज्याची ५९ गुणांची वाढ झाली. पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यप्रणाली या दोन निकषांमध्ये राज्याची कामगिरी सुधारल्याचे दिसते.
